Thursday, April 9, 2020

पराक्रम भारतमातेच्या वीर सैनिकांचा-वीर सैनिक मनोज कुमार पांडे

आज आपण अश्या एका वीर जवानाचा इतिहास समजून घेणार आहेत. ज्यांच्या शौर्याची दखल घेत २००३ साली एलओसी कारगिल या नावाचा चित्रपट  प्रदर्शित करण्यात आला आणि त्यांची भूमिका अभिनेता अजय देवगणने साकारली होती.

वीर सैनिकाचे नाव - मनोज कुमार पांडे
जन्म- २५ जून, १९७५
सीतापूर, उत्तर प्रदेश.
मृत्यू- ३ जुलै, १९९९ (वय २४) बटालिक सेक्टर, कारगिल
सैन्यशाखा- भारतीय सैन्य
हुद्दा- कॅप्टन
सैन्यपथक- १/११ गुरखा रायफल्स
लढाया व युद्धे- कारगिल युद्ध
पुरस्कार- परमवीरचक्र (मरणोत्तर)

▪️ वैयक्तिक जीवन
लेफ्टनंट मनोज कुमार पांडे ह्यांचा जन्म उत्तरप्रदेश मधील सितापूर येथे झाला. मनोज कुमार हे श्री गोपीचंद पांडे ह्यांचे पुत्र होते. मनोज हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे होते. त्यांचे वडील हे एक छोटे व्यापारी होते.मनोज ह्यांचे शिक्षण लखनौ येथील सैनिकी प्रशालेत झाले. ह्यांना मुष्टियुद्धात कमालीचा रस होता. मनोज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पदवीधर झाले. त्यांचे तेव्हा पासूनच १/११ गुरखा रायफल्स मध्ये जाण्याचे स्वप्न होते. भारतीय सेनेच्या परीक्षेच्या मुलाखतीत त्यांना विचारले गेले होते-"तुम्हाला सेनेत का यायचे आहे?" तेव्हा मनोज म्हणाले-"मला परमवीर चक्र पदक मिळवायचे आहे." त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना सेनेतील सर्वोच्च शौर्य पदक मिळालेही पण मरणोत्तर.

▪️ कारगिल युद्ध
मनोज ह्यांनी पाकिस्तानी घुसखोरांना ११ जून १९९९ ला बटालिक सेक्टरमधून परतवून लावले. त्यांनी त्यांच्या बरोबरील सैनिकांचे नेतृत्व करीत जुबर शिखरावर ताबा मिळवला. हे शिखर ताब्यात येणे त्यावेळी संघर्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. परिस्थिती लक्षात घेत मनोज यांनी आपल्या सैनिकांच्या समूहाला एका अरुंद लांबट उंचवट्यावर नेले. त्यामुळे त्यांना शत्रूच्या जागा लक्षात आल्या. उद्दिष्ट पूर्ण झालेले नसताना पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर गोळीबार सुरू केला. मोठे साहस दाखवून मनोज ह्यांनी तेवढ्याच प्रमाणात गोळीबाराचे उत्तर दिले. खांद्यावर व पायावर गोळी लागूनसुद्धा मनोज यांनी हार मानली नाही व पाकिस्तानी बंकरांपर्यंत जाऊन तेथे दोन सैनिकांना मारून पहिले बंकर ताब्यात घेतले. हेच या लढाईतले महत्त्वाचे वळण होते. आपल्या नेत्याच्या साहसाने प्रेरित होऊन बाकीच्या सैनिकांनीसुद्धा आपल्या शत्रूवर हल्ला चढवला. आपल्या जखमांकडे दुर्लक्ष करत मनोज ह्यांनी प्रत्येक बंकरामधील शत्रूच्या सैनिकांना मारायला सुरुवात केली. सर्वात शेवटचे बंकर ताब्यात घेतल्यावर अत्यंत घायाळ झाल्याने मनोज बेशुद्ध पडले. तोपर्यंत त्यांच्या सहकार्‍यांनी सर्व बंकरे ताब्यात घेतली होती.

▪️ ऑपरेशन विजय
कॅप्टन मनोज ह्यांनी कारगील जिंकण्यासाठीच्या ऑपरेशन विजयमधील काही हल्ल्यांमध्ये भाग घेतला व काही घुसखोरांना परतवले. २ जुलै १९९९च्या मध्यरात्री खालुबर पलटणची चढाई अंतिम टप्प्यात असताना शत्रूकडून हल्ला झाला. मनोज ह्यांना शत्रूची स्थिती कळण्यासाठी चढाई करण्यास सांगितले व लवकरात लवकर प्रतिहल्ला करण्यास सांगितले. कारण दिवसाच्या प्रकाशात मनोज ह्यांचा समूह दिसू शकला असता.

▪️ मृत्यू
न घाबरता कॅप्टन मनोज यांनी शत्रूच्या पहिल्या ठिकाणावर हल्ला केला, तेथे त्यांनी शत्रूच्या दोन सैनिकांना ठार केले. तसे दुसर्‍या ठिकाणावर हल्ला करून तेथेही दोन शत्रुसैनिकांना मारले. तिसर्‍या ठिकाणी हल्ला करताना. त्यांना छातीवर व पायांवर जखमा झाल्या. तरीही न घाबरता त्यांच्या जखमांची काळजी न करता त्यांनी त्यांच्या गटाचे नेतृत्व केले व चौथ्या ठिकाणी हातगोळा टाकून ते ठिकाण उद्‌ध्वस्त केले. त्या वेळी त्यांना कपाळावर गंभीर जखम झाली. शेवटी खूप जखमा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

▪️कॅप्टन मनोज यांचे शेवटचे शब्द होते 'ना छोडनु' (नेपाळी भाषेत) ('त्यांना सोडू नका'.). अशा प्रकारे मनोज यांनी वीरता, अदम्य साहस, कुशल नेतृत्व आणि कर्तव्याच्या प्रति समर्पण दाखविले आणि भारतीय सेनेच्या परंपरेत सर्वोच्च बलिदान दिले.

▪️ सन्मान
मनोज कुमार पांडे यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा भारतीय सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे वडील श्री गोपीचंद मनीष यांनाही ५२व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी भारताच्या राष्ट्रपतींकडून एक पुरस्कार प्राप्त झाला. मनोज पांडे देशात त्यांच्या त्यागासाठी एक हुतात्मा मानले जातात. ते सर्व लोकांसमोर एक आदर्श आहेत.

▪️ मनोज ह्यांची दैनंदिनी
मनोज ह्यांची एक स्वतःची डायरी होती. त्या डायरीमध्ये ते जे काही शिकले ते लिहीत असत. त्यांनी त्यात एक वाक्य लिहले आहे- काही लक्ष्ये इतकी योग्य असतात की ती हरणे सुद्धा शानदार असते!

सिग्मा करिअर अकॅडेमी ,सिंधुदुर्ग
आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF ,एअरफोर्स ,नेव्ही यांचे अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य व यशस्वी अकॅडेमी 
9850845094 /9403803087 /8668502903

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.